सायकलखरेदीसाठीही आता 'वेटिंग'! पाच महिन्यांत ४१ लाख सायकलींची विक्री

देशातील सायकलविक्रीत गेल्या पाच महिन्यांत जवळपास दुप्पट वाढ झाली असून, बहुतांश शहरांमध्ये ग्राहकांना आपली मनपसंत सायकल खरेदी करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार देशात प्रथमच मोठ्या प्रमाणावर सायकलची मागणी नोंदवण्यात आली आहे. करोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आपल्या तब्येतीविषयी फारच जागरूक झाल्याने सायकलची मागणी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
एका अहवालानुसार भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा सायकल उत्पादक देश आहे. सायकल निर्मात्यांची राष्ट्रीय संघटना असणाऱ्या ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार (एआयसीएमए) मे महिन्यापासून सप्टेंबर २०२०पर्यंतच्या पाच महिन्यांत देशात एकूण ४१ लाख ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झाली आहे. एआयसीएमएचे महासचिव के. बी. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार करोनाकाळात सायकलींच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इतिहासात प्रथमच सायकलींच्या बाबतीत असा ट्रेंड दिसून आला आहे.
सायकल विक्रीत १०० टक्के वाढ
ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच महिन्यांत सायकलींच्या विक्रीत १०० टक्के वाढ झाली आहे. बहुतांश शहरांमध्ये ग्राहकांना आपल्या पसंतीच्या सायकलची खरेदी करण्यासाठी बुकिंग करून वाट पाहावी लागत आहे. एआयसीएमएने दिलेल्या आकडेवारीनुसार करोना विषाणूच्या संक्रमणानंतर मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे देशभर एप्रिल महिन्यात एकाही सायकलची विक्री झाली नाही. त्यानंतर मे महिन्यात देशात एकूण ४ लाख ५६ हजार ८१८ सायकलींची विक्री झाली. जून महिन्यात सायकलींची विक्री दुपटीने वाढून ८ लाख ५१ हजार ०६०वर पोहोचली. सप्टेंबर महिन्यात सायकलविक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ती ११ लाख २१ हजार ५४४वर पोहोचली. गेल्या पाच महिन्यांमध्ये मिळून ४१ लाख ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झाली आहे.

No comments: