IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा नाद करायचा नाय, केकेआरवर मिळवला दणदणीत विजय

दुबई: मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात केकेआरवर दणदणीत विजय मिळवल्याचे पाहायला मिळाले. केकेआरने मुंबईपुढे विजयासाठी १४९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या क्विंटन डीकॉकने यावेळी दमदार अर्धशतक झळकावले. डीकॉकच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने केकेआरवर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. डीकॉकने यावेळी ४४ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
केकेआरच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने झकास सुरुवात केली. रोहित शर्मा आणि डीकॉक यांनी केकेआरच्या गोलंदाजांचा यावेळी चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी मुंबईला ९४ धावांची सलामी दिली. डीकॉकच्या यामध्ये अर्धशतकी वाटा होता. रोहितही यावेळी अर्धशतक झळकावेल, असे वाटत होते. पण रोहितला यावेळी ३५ धावांवर समाधान मानावे लागले. रोहित बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवला यावेळी जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. यादवला यावेळी १० धावांवर समाधान मानावे लागले. यादव बाद झाल्यावर फलंदाजी करायला हार्दिक पंड्या मैदानात आला. डीकॉक आणि पंड्या या जोडीने यावेळी मुंबईला विजय मिळवून दिला.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी या सामन्यात भेदक मारा केल्याचे पाहायला मिळाले. मुंबईने अचूक गोलंदाजीमुळे केकेआरच्या धावसंख्येला चांगलेच वेसण घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच केकेआरला यावेळी १४८ धावांवर समाधान मानावे लागले. या सामन्यात केकेआरची मुंबईने ५ बाद ६१ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर पॅट कमिन्स आणि कर्णधार इऑन मॉर्गन यांची चांगलीच जोडी जमलेली पाहायला मिळाली. या दोघांनी मिळून सहाव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. यामध्ये सर्वात जास्त योगदान हे कमिन्सचे होते. कमिन्सने यावेळी ३६ चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५३ धावांची खेळी साकारली. मॉर्गनने यावेळी २९ चेंडूंत २ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ३९ धावा केल्या.
मुंबईचा वेगवान गोलंदाज बोल्टने केकेआरला पहिला धक्का दिला. पण यावेळी सूर्यकुमारने जी कॅच पकडली ती अफलातून अशीच होती. कारण जोरदार फटक्यावर अशी कॅचही पकडली जाऊ शकते, यावर बऱ्याच जणांना विश्वासही बसला नव्हता. ही गोष्ट घडली ती तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर. बोल्टने यावेळी वेगवान चेंडू टाकला. या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहुल त्रिपाठीने केला. त्रिपाठीने यावेळी जोरदार फटका लगावला होता. त्यामुळे हा चेंडू चौकार जाईल, असे काही जणांना वाटले होते. पण सूर्यकुमारने यावेळी झेप घेत हा झेल टिपला.
IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा नाद करायचा नाय, केकेआरवर मिळवला दणदणीत विजय
Reviewed by square daily updates
on
October 17, 2020
Rating:

No comments: